जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील छत्रपती संभाजी महामार्गावर काही हॉटेल, ढाबे व इतर व्यवसायिकांनी अनधिकृतरीत्या दुभाजक तोडले होते. पोलिस दलाच्यावतीने या दुभाजकांची पाहणी करून ते बंद करण्यात आले आहेत. या मार्गावर २३ ठिकाणी अधिकृत दुभाजक तोडले आहेत. अनधिकृतरीत्या दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जालना ते छ. संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२१ वर नूर हॉस्पीटल ते गेडॉर टी पॉईन्ट पर्यंत पेट्रोल पंप, हॉटेल, धाबा, आस्थापना समोरील रस्त्याचे दुभाजक हे जाण्या-येण्यासाठी अनधिकृतपणे तोडण्यात आले होते. त्यामुळे या महामार्गावर वारंवार गंभीर अपघात घडत होते. गंभीर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या महामार्गावर कार्यकारी अभियंता, छ. संभाजीनगर येथील जागतिक बँक प्रकल्प विभाग यांच्याकडुन ५ डिसेंबर रोजी पोलीस संरक्षणामध्ये अपघातस्थळांच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबा व आस्थापना समोरील अनधिकृतपणे तोडलेल्या २३ दुभाजकाच्या ठिकाणी दुभाजकाची पुनर्स्थापना करण्यात येत आहे.
जालना- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२१ वरील नूर हॉस्पिटल ते गेडॉर टी पॉईन्ट जालना पर्यंतच्या रस्त्यावरील पेट्रोल पंप, हॉटेल, धाबा, आस्थापना चालक व मालकांना यानंतर दुभाजक अनधिकृतपणे न तोडण्याबाबत तसेच दुभाजक तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या बाबत पोलीस दलाकडून संबधीतांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.
दुभाजक तोडू नका जालना जिल्हा पोलिस दलाचे वतीने पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबा, अस्थापना चालक मालकांना आवाहन करण्यात येते की, या राष्ट्रीय महामार्गावरील नूर हॉस्पिटल ते ग्रेडर टी पॉइंट जालना पर्यतच्या रस्त्यावरील दुभाजक कोणीही अनधिकृतपणे तोडू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.