Action continues against drivers violating rules
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरात वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी शहर वाहतुक पोलिसांनी कारवाई करीत ५०६ वाहन चालकांवर ४ लाख ८१ हजारांची दंडात्मक कारवाई केली.
जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ५०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी प्रताप इंगळे व त्यांच्या पथकाने शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी करून तपासणी केली. वाहतूक शाखेकडून सुरू असलेली ही मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.