Abortion den in cowshed: Five arrested including doctor
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
भोकरदन तालुक्यातील गवळीवाडी येथील समाधान सोरमारे यांच्या शेतात गर्भपाताचे कृत्य चालू असल्याचे बुधवारी (दि. २६) उघडकीस आले. पोलिसांनी सायंकाळी छापा टाकून एका डॉक्टरसह तीन महिला, एका कर्मचाऱ्यास अटक केली.
भोकरदनमध्ये वर्षभरापूर्वीच अवैध गर्भपाताचे स्कॅण्डल उघड झाले होते. त्यात संभाजीनगर आणि शहरातील अनेक दिग्गज डॉक्टर अडकले असतानाच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून कारवाई झाली. सोरमारे यांच्या शेतातील बकऱ्यांच्या गोठ्यातच गर्भपाताचे केंद्र डॉक्टरांनी सुरू केले होते. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. केशव हरिभाऊ गावंडे (४९, रा. सराफा गल्ली, भोकरदन) सतीश बाळू सोनुने (३२, रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या तीर्थपुरी, अवघडराव सावंगी येथील तीन महिलांना ताब्यात घेतले.
यावेळी गर्भपातासाठी लागणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले. यात पोर्टेबल वायरलेस सोनोग्राफी, मोबाईल अॅप्लिकेशन, दोन मोबाईल व गर्भपाताच्या गोळ्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या पथकात डॉ. विजय वाकुडे, अॅड. सोनाली कांबळे, डॉ. वायाळ, डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. मनोज जाधव, मयूर गिराम, पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांचा समावेश होता.