

सेलू (छत्रपती संभाजीनगर ) : शहराचे ग्रामदैवत व श्री साईबाबांचे सदगुरु म्हणून भाविकांमध्ये श्रध्दास्थान असलेल्या श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेव महाराज (व्यंकूशहा) यांचा वार्षिक यात्रा महोत्सव गुरुवारी (दि. २७) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी परिपूर्ण अशा महोत्सवाची सांगता दि.५ डिसेंबरला होणार आहे. यंदाचा महोत्सव विशेष भव्यतेने साजरा करण्यासाठी मंदिर परिसरात सर्व तयारी पूर्ण झाली.
अखिल धार्मिक कार्यक्रमांची मालिका असून सदरील यात्रा कालावधीत दररोज विविध पारायण व उपासना कार्यक्रम आयोजित केले. यात अखंड विष्णु सहस्त्रनाम पठण, श्रींना लघुरुद्र व पवमान अभिषेक, महिलांचे भजन, शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण, अखंड हरिनाम, गुरुचरित्र पारायण, ऋग्वेद शाकल संहिता पारायण, कीर्तन व भागवत सप्ताह यांचा समावेश आहे. भागवत कथेचे निरूपण नंदकुमार गोंदीकर महाराज यांच्या मधून वाणीतून दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
सकाळी ९ ते १० संहिता वाचन, दुपारी १२ ते ५ भागवत कथा निरूपण होणार असून भाविकांसाठी हा आध्यात्मिक ऐश्वर्याचा सोहळा ठरणार आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने दररोज रात्री ९ वाजता कीर्तनांचे विशेष आयोजन करण्यात आले. दि. २७ व २८ नोव्हेंबर रोजी हभप. शालिग्राम अतुलराव मुळे (उमापूर), दि.२९ व ३० नोव्हेंबरला दिपाली रघुनाथराव कुलकर्णी, दि.१ डिसेंबर रोजी हभप. बालासाहेब नेव महाराज हे श्रींच्या चरित्रावर आधारित कीर्तन करतील, दि.२ डिसेंबरला दिपाली कुलकर्णी, दि.३ डिसेंबर रोजी हभप. पुरुष-ोत्तम महाराज वालूरकर यांची किर्तन होणार आहेत. दरम्यान दि.१ डिसेंबरला गीता जयंती व पुण्यतिथी उत्सव होणार आहे. मार्गशीर्ष शुध्द ११, शके १९४७, सोमवार या दिनी श्री व्यंकूशहांची पुण्यतिथी व गीता जयंती एकत्र साजरी होत आहे. सकाळी ७ ते ९ श्रींच्या ओवीवध्द चरित्राचे सामूहिक पाठ (३ पाठ), श्रीमद भगवतगीतेचे संपूर्ण १८ अध्याय पठण, सायंकाळी श्रींची आर-धिना, अभिषेक व महापूजा, रात्री ९ वाजता हभप. बालासाहेब नेव महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दि.४ डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून हा मुख्य सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती, दुपारी ३ वाजता शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान सोहळयात दि.५ डिसेंबरला सांगता होणार असून दुपारी ४ वाजता हभप. सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तनाने यात्रा महोत्सवाची सांगता होईल. लघुरुद्र अभिषेकासाठी इच्छुकांनी सुधीर केशवराव मंडलिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कलावंतांचा सहभाग
यात्रेत शहरातील महिला-पुरुष भजनी मंडळांसह मृदंगाचार्य विठ्ठल काळे, सदाशिव समेळ, दत्तात्रय टोलमारे, सुधाकर शिंदे, तबलावादक गंगाधर कान्हेकर, केदार तांबट, संवादिनीवादक कृष्णा लिंबेकर, तसेच वेदशास्त्र संपन्न नागनाथ शास्त्री विडोळीकर आणि साथसंगत माधवराव वानरे यांचा सहभाग राहणार आहे. यात्रा उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री केशव नारायणराव मंडलिक, वामन नारायणराव मंडलिक, पुरुषोत्तम नारायणराव मंडलिक यांनी केले आहे.