A grand memorial will be built in honor of Ahilyadevi Holkar
जालना, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असून हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले, असे प्रतिपादन माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
जालना शहरातील अंबड चौफुली येथे उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंडरग्राउंड करणे व डीपी स्थलांतर या २५ लाख रुपये खर्चाच्या कामाचे उद्घाटन आमदार लोणीकर यांच्या हस्ते रविवारी दि.८ पार पडले. यावेळी ते उपस्थित धनगर समाजबांधवांना मार्गदर्शन करत होते.
अंबड चौफुली येथे उभारण्यात येणाऱ्या या भव्य स्मारकासाठी जिल्हा नियोजन व आर्थिक विकास समितीमार्फत ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी आमदार लोणीकर यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. भविष्यात स्मारकासाठी आणखी निधीची गरज भासल्यास तो विविध शासकीय हेडमधून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही आमदार लोणीकर यांनी दिले. निधी मंजुरीबद्दल जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष कपिल दहेकर, सचिव शांतीलाल बनसोडे, भगवान माथले, रामराव कोल्हे, कृष्णा गायके, नितीन कानडे, शिवप्रकाश चितळकर, माधव वाघमारे, अनिल धारे, रामप्रसाद शेळके, अक्षय आटोळे, बाबासाहेब आटोळे, बाबासाहेब आबुज, विशाल लवटे, सौरभ भिसे, शिव वीर, रामेश्वर बकाल, श्री इंगळे, श्री वैदय, ज्ञानेश्वर भुसारे, दत्ता कुरधने, ऋषीं कुरधने, संतोष कोल्हे उपस्थित होते.
विद्युत वाहिनी अंडग्राउंडच्या कामाचे उद्घाटन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंडरग्राउंड करणे व डीपी स्थलांतर या २५ लाख रुपये खर्चाच्या कामाचे उद्घाटन आमदार लोणीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी धनगर समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.