A 'Forest of Poison,' not a 'Forest of Nectar'; piles of garbage at the entrance
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी मोती बाग परिसरात अमृत वन प्रकल्प राबविण्यात आला. तेथे ओपन जीम, सायकलिंग ट्रॅकची सोय करण्यात आली होती. मात्र, सध्या या अमृत वन प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशदाराजवळच संकलित कचरा आणून टाकल्या जात असल्यामुळे मरणकळा आली आहे. शिवाय, या कचऱ्याला आग लागल्यामुळे हवा प्रदूषित होऊन स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शहरातील दररोज निघणारा कचरा, होत असलेले वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या कचऱ्याचे गणित बिघडले आहे. सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने सुरू नाही. कचरा टाकण्यासाठी येथेही जागा अपुरी पडत आहे. परिणामी, या कचरा संकलन केंद्रात आवश्यकतेपेक्षा जास्त कचरा जमा झाला आहे. येथे बाजूलाच एक वस्ती राहत असून, त्यांना या कचऱ्यांतून सुटणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरात ६८ हजार २६४, मालमत्ता असल्याची नोंद मनपाच्या कर विभागाकडे आहे. त्यामुळे शहरात प्रतिदिन तब्बल १२० ते १५० टन कचरा पडतो.
कचऱ्याचे संकलनही केल्या जाते. सध्या ५२ घंटागाड्यांद्वारे शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जात आहे. हा कचरा संकलन करुन अमृत वन परिसरात आणून कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येते. यामुळे कचरा वाढत चालला आहे.
लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दुर्लक्ष
घंटागाड्या चालकांनी मानधन रखडल्यामुळे आंदोलन पुकारले होते. यामुळे शहरात कचरा साचला आहे. विठ्ठल मंदिर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अमृत वनाशेजारी साचत असलेल्या कचऱ्याच्या डोंगरावर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला देखील काही सोयरं सुतक नसल्याचे दिसून येत आहे.