Malnutrition : आरोग्याचे वाळवंट ! ताटात योजना; पण पोटात भूक  File Photo
जालना

Malnutrition : आरोग्याचे वाळवंट ! ताटात योजना; पण पोटात भूक

जिल्ह्यात ५०९ बालके तीव्र कमी वजनाचे, घनसावंगी हॉटस्पॉट

पुढारी वृत्तसेवा

509 children in the district are severely underweight, Ghansawangi hotspot

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात कुपोषणाचे सावट अद्यापही कायम असून, नुकत्याच झालेल्या जून महिन्यातील तपासणीत ५०९ वालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. तर ३,४०३ बालके मध्यम कुपोषित असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. शासनाच्या विविध योजनांनंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात बालके कुपोषित असल्याने गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

अंगणवाडी सेविकांकडून दर महिन्याला बालकांचे वजन, उंची आणि आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीत मिळालेल्या अहवालानुसार, तीव्र आणि मध्यम कुपोषण तसेच कमी वजनाच्या बालकांची नोंद जिल्हा परिषदेकडे दिली जाते. त्यानंतर संबंधित बालकांना शासन योजनांतर्गत पौष्टिक आहार, औषधे आणि मातांना आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते. परंतु तरीही परिस्थिती लक्षणीय सुध- ारली नसल्याचे दिसते. जालना जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण हे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. शासन व समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांशिवाय हे चित्र बदलणे कठीण आहे.

योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करून, तळागाळातील कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हा यावरचा एकमेव उपाय आहे. ताज्या आकडेवारीनुसार, घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ११७तीव्र कुपोषित बालके असून, त्यापाठोपाठ जालना तालुक्यात ७९. अंबडमध्ये ८२, भोकरदनमध्ये ५४, बदनापूरमध्ये ४६ आणि जाफराबादमध्ये २९ तीव्र कुपोषित बालके आहेत.

मध्यम कुपोषणाच्या बाबतीत जालना तालुका अव्वल असून, येथे ६७९ मध्यम कुपोषित बालके नोंदली गेली आहेत. अंबड (५२०), भोकरदन (५५४), घनसावंगी (४७३), बदनापूर (३६४) आणि जाफराबाद (२३४) तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात मध्यम कुपोषण दिसून येते. अंगणवाडी सेविकांना बालकांची तपासणी, अहवाल सादर करणे, लाभार्थ्यांना आहार व औषध वितरण, तसेच मातांना मार्गदर्शन अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तरीही सर्वाधिक परिणामकारकतेसाठी त्यांना अतिरिक्त संसाधने व मनुष्यबळाची गरज भासत आहे.

कुपोषणाचे भीषण दुष्परिणाम

कुपोषित बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना वारंवार सर्दी, ताप, अतिसार यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत शिक्षण, शारीरिक वाढ आणि मानसिक विकास यावर गंभीर परिणाम होतो. महिला व बालविकास विभागाकडून कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मोहीमा राबवल्या जात असल्या तरी परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

कुपोषित बालकांसाठी नियमित आहार, औषधोपचार व मातांना जागरूकता देणे सुरू आहे. एकही बालक कुपोषित राहू नये, हा आमचा उद्देश आहे. पालकांनीही बाळाच्या चांगल्या आहाराकडे लक्ष द्यावे.
कोमल कोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जालना.
जिल्ह्यातील विविध भागांत कुपोषित बालके आढळत आहेत. कुपोषण दूर करण्यासाठी केवळ विद्यमान योजना नव्हे, तर आणखी वाढीव व लक्ष्यित योजना राबवणे आवश्यक आहे, तसेच पालकांतही जाणिव जागृती करणे गरजेची आहे.
पुष्कराज तायडे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT