₹40,000 siphoned off from woman's account after obtaining PIN
जालना, पुढारी वृत्तसेवाः पैशांचे ट्रान्झेक्शन करत असताना नजर चुकवून एटीएम कार्ड बदलल्याची आणि खात्यातील ४० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना जालना शहरात घडली आहे.
फिर्यादी कविता संदीप शिंदे (रा. व्यंकटेश नगर, जालना) या बुधवार, दि. ७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे ३५ ते ४५ वयोगटातील एक अनोळखी इसम उभा होता. त्यांनी २० हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन केले, त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांचा एटीएमचा पिन पाहून घेतला.
त्यानंतर पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ट्रान्झेक्शन झाले नाही. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या त्या अनोळखी इसमाने "इंटरनॅशनलचे ऑप्शन चॉईस करा, पैसे निघतील" अशी बतावणी केली. घरी परतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आरपी रोड येथील एटीएममधून १० हजार रुपयांचे दोन वेळा असे एकूण २० हजार रुपये निघाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे.