34 Shiv Bhojan centers in the district will receive grants
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या ३४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून गरिबांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापोटी आता या शिवभोजन केंद्रांना ३ लाख ९१ हजार २०० रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. शासनाच्यावतीने याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने गरिबांना अल्प दरात भोजन मिळावे, या उद्देशाने 'शिवभोजन थाळी' योजना सुरू केली. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण ३४ शिवभोजन केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. सध्या ही सर्व केंद्र सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात सर्व केंद्र मिळून तीन हजार नागरिक जेवण करून तृप्त होतात. गरिबांना वेळेवर १० रुपयांत सवलतीच्या दरात जेवण दिले जाते. मात्र, या योजनेतील केंद्रचालकांची देयके मार्च महिन्यांपासून रखडली आहेत.
त्यामुळे गरिबांना अल्प दरात वेळेवर भोजन देणाऱ्या केंद्रचालकांवरच उपासमारीची वेळ आली होती. अखेर शासनाने केंद्रचालकांच्या मागणीची दखल घेत शुक्रवार दि.४ रोजी हे अनुदान वितरित केले जाणार असल्याचे शासन निर्णय काढून जाहीर केले. राज्य शासनाने २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरातील गरीब व नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी 'शिवभोजन थाळी' योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरिबांना १० रुपयांत सवलतीच्या दरात जेवण दिले जाते.
जालना जिल्ह्यातील गरीब नागरिकांकडून शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील एकही शिवभोजन केंद्र अद्याप बंद पडले नाही; परंतु या केंद्रचालकांना शासन वेळेवर पैसे देत नसल्याने घरातून पैसे टाकून गरिबांना जेवण द्यावे लागत आहे. त्यामुळे केंद्रचालक आर्थिक संकटात सापडले होते. त्यांना लवकरच शिवभोजन अॅपच्या माहितीच्या अनुसार परिगणनना होउन अनुदानाची रक्कम आटीजीएस पध्दतीने वितरित केली. जाणार आहे.
राज्य शासनाने गरिबांना अल्प दरात भोजन मिळावे, या उद्देशाने 'शिवभोजन थाळी' योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जेवण दिले जाते. दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, एक वाटी भात दिला जातो. यासाठी आलेल्या नागरिकांकडून १० रुपये आकारले जातात. ग्रामीणमध्ये ३५ तर, शहरी भागात ५० रुपये अनुदान दिले जाते.
शिवभोजन केंद्राच्या जागेनुसार त्या केंद्रांना रोज भोजन थाळींची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. शहरी भागात काही केंद्रांना १००, काहींना १५०, तर काही केंद्रांना २०० थाळींची मर्यादा आहे. तर ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्रांना ७५ थाळींची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सरसगट सर्वांना २०० थाळींची मर्यादा निश्चित करून द्यावी. अनुदानाची मागणी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी दखल घेत अनुदान वितरित करण्यात आले.-अमोल खरात, शिवभोजन केंद्रचालक, कन्हैयानगर, जालना.