Jalna News : ३३ हजार १९६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क file photo
जालना

Jalna News : ३३ हजार १९६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

८९ मतदान केंद्र; ४५ नोडल अधिकारी, ४५ झोनल अधिकारी नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

33,196 voters to exercise their right to vote

जालना, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात ८९ मतदान केंद्रांच्या माध्यमातून अंतिम मतदार यादीनुसार एकूण ३३ हजार १९६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २६ हजार ७३२ पुरुष, ६ हजार ४६३ महिला आणि एका इतर मतदाराचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ८९ मतदान केंद्रांच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ४५ नोडल अधिकारी, ४५ झोनल अधिकारी, १०० मायक्रो ऑब्झर्व्हर आणि १०५ मतदान केंद्राध्यक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पारपाडण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा नोडल अधिकारी श्रीमती मनीषा देशपांडे यांनी दिले.

नायब तहसीलदार, घनसावंगी श्रीमती मोनाली सोनवणे यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांच्या कर्तव्यांबाबत माहिती दिली. मास्टर ट्रेनर यांनी जम्बो मतपेटी हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (हँड्स-ऑनट्रेनिंग) दिले. यावेळी मतपेटी हाताळणी व सीलिंगची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच या प्रक्रियेचा व्हिडिओ क्लिपही दाखविण्यात आल्या.

निवडणुकीसंदर्भातील विविध विवरणपत्रे अचूकपणे भरण्याबाबतही माहितीही देण्यात आली. या प्रशिक्षणास आयुक्त, जालना शहर महानगरपालिका; पोलीस अधीक्षक, जालना; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना; सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष आणि मायक्रो ऑब्झर्व्हर उपस्थित होते.

पहिले जिल्हास्तरीय प्रशिक्षण उत्साहात

जालना जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले जिल्हास्तरीय प्रशिक्षण शुक्रवार (दि. ९ ऑक्टोबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले. या प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रियेतील विविध जबाबदाऱ्या, मतदान केंद्रांचे व्यवस्थापन, मतपेटी हाताळणी, सीलिंग तसेच आवश्यक विवरणपत्रे भरण्याबाबत सविस्तरमार्गदर्शन करण्यात आले. २२ सप्टेंबरपासून संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

या लिंकवर तपासता येईल मतदाराचे नाव

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या मतदारांना संबंधित मतदार यादीत आपले नाव https://share.google/e8yc6mjnDQW8hYwKC या लिंकवर तपासता येणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने आणि दक्षतेने पूर्ण करावीत. तसेच तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणारे दुसरे व तिसरे प्रशिक्षण गांभीर्याने पूर्ण करून मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT