1839 candidates will appear for the exam for the post of 183 Police Patil.
घनसावंगी / वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवाः अंबड उपविभागांतर्गत अंबड व घनसावंगी तालुक्यांतील रिक्त असलेल्या १८३ पोलीस पाटील पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी घेण्यात येत आहे.
या परिक्षेसाठी अंबड व घनसावंगी तालुक्यांतुन १ हजार ८६९ उमेदवार परिक्षा देणार आहेत. परीक्षेचे आयोजन अंबड आणि घनसावंगी करिता जालना येथील एकूण ६ विविध केंद्रांवर करण्यात आले आहे.
पोलिस पाटील भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निःपक्षपाती आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी उपयोजना करण्यात आल्या आहे. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपविभागीय दंडाधिकारी, अंबड उमाकांत पारध यांच्या थेट नियंत्रणाखाली पार पडणार असल्याची माहीती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.
सर्व परीक्षा केंद्रांवर आणि प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, परी क्षेचे थेट वेबकास्टिंग केले जाणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आणि परीक्षा देताना प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र व्हिडिओग्राफी केली जाईल. परीक्षे दरम्यान आकस्मिक तपासणी करण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस पाटील भरती प्रक्रिया केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार असुन कोणत्याही व्यक्तीने किंवा दलालाने (एजंट) नोकरी लावण्याचे किंवा परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवल्यास त्यावर विश्वास ठेवू नये
गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज
परीक्षेदरम्यान कोणताही उमेदवार कॉपी करताना, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना किंवा इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गैरप्रकारात सामील असल्याचे सिद्ध झाल्यास, त्या उमेदवाराला कायमस्वरूपी शासकीय नोकरभरतीसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि भविष्यात कोणत्याही शासकीय परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.