170 animals were injected with Lumpy vaccine
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुकयातील पारध, पिंपळगाव रेणुकाई परिसरातील सुमारे १७० लहान मोठ्या जनावरांना लम्पीची लस देण्यात आली आहे. लम्पीचा उद्रेक थांबवण्यासाठी लसिकरणाची उपाययोजना राबविण्यात आली.
दरम्यान, भोकरदन तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात लम्पी आजाराचे लोन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे पशुपालक चिंतेत आहे. दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढते. अशा परिस्थितीत पारध येथील शेतकरी पुत्र सागर देशमुख यांनी पुढाकार घेत पशु विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावुन पारध, पिंपळगाव रेणुकाई यासह इतर गावातील १७० लहान मोठ्या जनावरांना गोठ्यावर जात लम्पीचा लस टोचण्यात आली. शिवाय याबाबत जनजागृती ही करण्यात आली.
त्यामुळे गावातील अनेक जनावरांना या आजारापासून संरक्षण मिळाले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती कमी झाली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोफत लसीकरणामुळे अनेक गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपली जनावरे वाचविण्याची संधी मिळाली, जे अन्यथा खर्चामुळे शक्य झाले नसते. या मोहिमेत स्थानिक पशुवैद्य, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. योग्य नियोजन, जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजा वणीवरही भर दिला. जनावरांच्या आरोग्याबाबत सजगता वाढवण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीम सोबत त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला, आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत डॉक्टरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे जनावरांचे प्राण वाचणारच नाहीत, तर शेतकऱ्यांची उपजीविकाही सुरक्षित राहील. समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांना हातभार लावावा, हीच अपेक्षा सागर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरमहा या कार्यात पारध येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर फुके यांच्या मार्गदर्शकाखाली हा कॅम्प राबवण्यात आला. यामध्ये उमेश ताजी, दत्तू वनारसे, शेख साकिव, डॉ. अमोल लोखंडे डॉ. संतोष कोथलकर यांनी परिश्रम घेतले.
पारध येथे लम्पी लसीकरण राबविण्यात आले. या माध्यमातून १७० जनावरांना लम्पीचे लसीकरण करण्यात आले. अजून काही जनावरांना लस द्यायची बाकी आहे. सर्व शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना पारध येथे येऊन ही लस आपल्या जनावरांना द्यावी.-राजेश फूके, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना पारध