

चंदनझिरा : जालना शहराजवळील राजुर रोडवर भरधाव मालवाहू ट्रकने रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाअप्पा बारसे (वय ३४), सुनिता नारायण वैद्य (वय ३६, तिघेही रा. मांडवा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मांडवा गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भरत खोसे, गणेश बारसे, सुनिता वैद्य हे तिघे ॲपे रिक्षा (क्रमांक MH २१-२३७२) मधून जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते. राजुर रोडवर सुर्या रिसार्ट परिसरात ही रिक्षा आली असता भारधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने (क्र. RJ 0१ GB ८४६८) रिक्षाला समोरून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रिक्षाचा चक्काचूर होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करत वाहनधारकांना मोकळी वाट करून दिली. या घटनेची माहिती मिळताच मांडवा येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने चंदनझिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. एकाच दिवशी गावातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याच्यावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.