मराठवाडा

जालना : सोयाबीन बोगस बियांण्याच्या साठ्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

निलेश पोतदार

भोकरदन : पुढारी वृत्‍तसेवा गेल्या पाच दिवसांपुर्वी भोकरदन तालुक्यातील बरंजळा पाटीजवळ कृषी विभागाने बोगस बियाणांचा भांडाफोड केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने कृषी विभागाच्या कारवाई बाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र अखेर या प्रकरणी मंगळवारी (दि.१३) मध्यरात्री कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक राजेश तांगडे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र राज्याचा बियाणे प्रक्रीया साठवणूक व विक्री परवाना नसतांना सोयाबीन केडीएस-७२६ बियाणे साठवणूक, प्रक्रीया व पॅकींग केल्याने मे. लोकप्रिया सिड्स प्रा.लि. व जबाबदार व्यक्ती कालीपाका अमितकुमार शंकर (मेडचल मलकाजगीरी, तेलंगना), बायडेन ॲग्रोवेट इंडिया प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीचे सुनिल भाऊसाहेब कऱ्हाळे (रा.वालसा डावरगांव ता.भोकरदन) पुर्णा केळणा शेतकरी उत्पादन कंपनीचे जबाबदार व्यक्ती विजय गंगाराम म्हस्के ( रा.बरंजळा लोखंडे ता.भोकरदन जि.जालना) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरिपाची पेरणी तोंडावर असताना बोगस बियाणांचा सुळसुळाट वाढला आहे. भोकरदन कृषी विभागाने बोगस बियाणांचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत २५० क्विंटल  सोयाबीन बियाणांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी लोकप्रिया सिड्स प्रा.लि, सुनिल कऱ्हाळे, विजय म्हस्के यांनी रविवारी (दि.११) त्यांच्याकडे असलेली बियाणे उत्पादनासंदर्भातील कागदपत्रे जमा केली. यात लोकप्रिया सिड्स प्रा.लि. मेडचल मलकाजगीरी, तेलंगना यांना महाराष्ट्र राज्यातील बियाणे प्रक्रीया व विक्री परवाना नसल्याचे दिसून आले. तसेच सदर कंपनीच्या वतीने पुर्णा-केळणा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकासोबत दि.२२ जानेवारी २०२३  रोजी १२० मे.टन सोयाबीन खरेदीबाबत कच्चा करार केल्याचे दिसून आले.  मे. पुर्णा-केळणा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचा सन २०२२-२३ चा बियाणे उत्पादन कार्यक्रमचे आवलोकन केले असता, खरीप २०२२ मधील सोयाबीनचे अपेक्षित बियाणे उत्पादन २८८ क्विंटल असून, त्यांनी १२०० क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठ्याबाबत लोकप्रिया सिड्स प्रा.लि. यांच्यासोबत करार केल्याचे दिसून येते. परंतु लोकप्रिया सिड्स प्रा.लि. यांच्या सोयाबीन केडीएस-७२६ या बियाण्यांच्या बॅगची पाहणी केली असता, त्यावर उत्पादक म्हणून पुर्णा-केळणा फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांचे नाव अपेक्षित असतांना त्या ऐवजी उत्पादक व विपणन कर्ता म्हणून लोकप्रिया सिड्स प्रा.लि. यांचे नाव असल्याचे आढळून आले.

तसेच बायडेन ॲग्रोवेट इंडिया प्रा.लि.औरंगाबाद या कंपनीचा परवाना सुनिल भाऊसाहेब सुनिल कऱ्हाळे (रा.वालसा डावरगांव ता.भोकरदन जि.जालना ) यांच्या नावे असून परवान्यात नमुद केल्यानूसार त्यांनी बियाणे साठवणूक, प्रक्रीया व पॅकींग ही गट न. ७७ वालसा डावरगांव या ठिकाणी करणे अपेक्षित असतांना त्यांनी गट ३५४ हॉटेल समाधान ढाबाच्या बाजुस असलेल्या गोदामामध्ये केल्याचे आढळून आले. तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन बियाण्यावर बियाणे लॉट नंबर,  उत्पादन तारीख, अंतीम तारीख व पिकाचे वाण या बाबीचा उल्लेख नसल्याचे आढळून आले.

तसेच पुर्णा केळणा शेतकरी उत्पादक कंपनी, गट क्र. ३५५ बरंजळा लोखंडे, यांचे उत्पादन कार्यक्रम सन २०२२-२३ चे अवलोकन केले असता त्यांनी २८८ क्विंटल  केडीएस- ७२६ (फुले संगम) या सोयाबीन वाणाचे अपेक्षित उत्पादन असतांना महाराष्ट्रामध्ये साठवणूक, विपणन व विक्री परवाना नसलेल्या लोकप्रिया सिड्स प्रा.लि. यांच्यासोबत १२०० क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठ्याबाबत करार केल्याचे दिसून येते. तसेच पुर्णा केळणा शेतकरी उत्पादन कंपनीचे जबाबदार व्यक्ती  विजय गंगाराम म्हस्के यांनी बिजोत्पादन कार्यक्रमाबाबत जिल्हा प्रशासनास कुठलीही माहिती सादर केली नाही. त्यामुळे पुर्णा-केळणा शेतकरी उत्पादक कंपनी व त्यांचे संचालक यांनी तालुका कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक राजेश तांगडे यांच्या फिर्यादीवरुन तिघांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे दाखल करण्यासाठी उशीर का ?

भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणारे प्रकरण नऊ जून रोजी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात संबंधित तिघा लोकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी 14 जून ही तारीख का उजाडावर लागली, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. बोगस सोयाबीन प्रकरणात स्थानिक कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT