मराठवाडा

ओबीसीत समावेश करण्यासाठी सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

मोहन कारंडे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आता ओबीसी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. सरकारने समाजाला संविधानिक ५० टक्क्यांच्या आत टिकणारे ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र दिनापासून क्रांतीचौकात आंदोलन सुरु केले आहे. यावेळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या.

आम्ही सरकारकडे जाणार नाही. सरकारने छत्रपती संभाजीनगरला चर्चेला यावे, अशी आंदोलकांची भूमिका कायम आहे. मराठा क्रांती मोर्चा नव्हे तर, सकल मराठा समाजाच्यावतीने आम्ही आंदोलन करत असल्याचे यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मराठा क्रांतीमोर्चाला भव्य स्वरुप मिळाले. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठीही छत्रपती संभाजीनगरातूनच आंदोलन सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी येथील मराठा संघटनांनी घेतला होता. त्यानुसार आजपासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

क्रांतिचौकात सकाळी आंदोलनस्थळी संविधानाचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनासंदर्भात पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे. मराठा आणि कुणबी व कुणबी आणि मराठा एकच असल्याचे अनेक पुरावे आम्ही सरकारला दिले आहेत. खतर आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, भाटिया आयोग, राणे समिती, म्हसे आयोग, गायकवाड आयोग यांच्या समोर तोंडी व लेखी पुरावे सादर केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रविंद्र वहाटुळे, विजय काकडे, अवधूत शिंदे, शैलेश भिसे, इंद्रजित मुळे, सुरेश गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, रेखा वहाटुळे, सुवर्णा मोहिते, मनिषा मराठे, सुवर्णा तुपे, दिव्या पाटील आदींसह मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

… तर मराठवाड्याचा समावेश तेलंगणामध्ये करण्याची परवानगी द्यावी

राज्यात काही विभागांमध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळते. मराठवाड्यात अशा प्रकारे कुणालाही आरक्षण मिळत नाही, त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना वेगळा लढा उभारावा लागणार असून जर राज्यसरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर मराठवाड्याला तेलंगणा राज्यात समावेश करण्याची परवानगी देण्यात यावी, असेही यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी सांगितले.

अनोख्या पोस्टरने लक्ष वेधले

संविधानाने सर्वांना समान काम, समान वेतन, समान न्याय दिला असेल तर मग आम्हाला न्याय का नाही, असे मोठे पोस्टर आंदोलनस्थळी लावण्यात आले होते. यावेळी मी शेतकरी कुणबी, मी विहीर खोदणारा मजूर, मी मराठा गुराखी, मी मराठा रोहयो मजूर आदी पोस्टरमधील फोटो लक्ष वेधून घेत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT