हिंगोली : वसुली कर्मचाऱ्यांकडून २८९ महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल  Pudhari File Photo
हिंगोली

हिंगोली : वसुली कर्मचाऱ्यांकडून २८९ महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथील इसाफ बैंक शाखेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी २८९ महिलांची ५.०७ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघड झाले असून त्यांनी कर्जाचे हप्ते जमा करून बँकेत भरणाच केली नाही. याप्रकरणी बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव येथे इसाफ बँकेची शाखा आहे. या शाखेकडून ग्रामीण भागात १० महिलांचे गट तयार करून त्यांना बँकेकडून प्रत्येकी चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जाची दोन वर्षात परतफेड करून त्यांच्याकडून ५०६०० रुपये परतफेड भरून घेतली जाते. त्यासाठी दर पंधरा दिवसांनी बँकेचे वसुली कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन त्या महिलांकडून कर्ज हप्ताची रक्कम घेतात त्याच ठिकाणी त्यांना कर्ज भरणा केल्याची पावती देखील दिली जाते.

दरम्यान, बँकेचे वसुली कर्मचारी गोवर्धन चिंचबनकर व आकाश दुधारे (दोघे रा. भोकर जि. नांदेड) यांनी १५ मे २४ ते ३१ जुलै २४ या कालावधीत कर्जदार महिलांकडून कर्ज हप्त्याची वसुली केली. यामध्ये गोवर्धन याने १७२ महिलांचे ३.५३ लाख रुपये तर आकाश याने ११७ महिलांचे १.५४ लाख रुपये वसुल केले. मात्र सदर रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही तसेच बँकेतही रक्कम दिली नाही. दरम्यान, त्या महिलांचे कर्जहते थकीत झाल्यामुळे बँकेकडून त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्या नंतर महिलांनी कर्जाचे हप्ते वेळेवर दिल्याचे सांगितले. त्यावरून बँकेने चौकशी केली असता गोवर्धन व आकाश यांनी महिलांकडून पैसे घेतले पण पावती दिली नाही व बँकेतही पैसे भरले नसल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी बँकेचे अधिकारी लवकुश जाधव यांनी बुधवारी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गोवर्धन व आकाश यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संतोष तांबे, उपनिरीक्षक एस. बी. स्वामी पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT