मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत शहरातील नगरपालिकेच्या समोरील सिद्धेश्वर गल्लीत असलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करून दोन जणांविरुद्ध अनैतिक प्रतिबंधक अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २४) रात्री १० च्या सुमारास करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, शहरातील सिद्धेश्वर गल्लीतील एका घरात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना घटनास्थळी २ महिला आढळून आल्या. पोलिसांनी या महिलांजवळील मोबाईल व रोख रक्कम जप्त करीत त्यांची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल लोखंडे व श्याम कच्छवे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून याबाबतचा पुढील तपास पाथरी पोलीस निरीक्षक सुकळे हे करीत आहेत.