Kalmanuri youth murder case
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे एका तरुणाचा रुमालाने गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 23) उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वडगाव (ता. कळमनुरी) येथील ज्ञानेश्वर मारोतराव गाडेकर (वय 30) आणि चंद्रकांत मुरलीधर बागल हे दोघे 22 डिसेंबर रोजी रात्री रामेश्वर तांडा येथे दारू पिण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादात ज्ञानेश्वर गाडेकर यांनी चंद्रकांत बागल याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून संशयिताने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून समजते.
संशयित चंद्रकांत बागल याने 22 डिसेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास डिग्रस रोडवरील बसस्थानक परिसरात अंधाराचा फायदा घेत ज्ञानेश्वर गाडेकर याला बेशुद्ध करून गळ्यातील रुमालाने गळा आवळला. त्यानंतर मृतदेहाजवळ शेकोटी करून रात्रभर बसून होता. मृतदेह बस स्थानकातून बाजूला ओढत नेऊन टाकून दिला, मृतादेहाजवळ निरोध पाकिट, चुना डबे, तंबाखू पुड्या आढळून आल्या होत्या. त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे, जमादार शेख बाबर, शिवाजी पवार, सुनील रिठे व गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासासाठी ठसे तज्ज्ञ व स्वान पथक पाचारण करण्यात आले असून परिसरातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
मृत ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन रामेश्वर तांडा येथील उपकेंद्रात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.