Youth attacked with knife over minor dispute
वसमत, पुढारी वृत्तसेवा येथील कारखाना रोड भागात किरकोळ कारणावरून एका खंजर व चाकूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आर-ोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत.
येथील रेहान कुरेशी हे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारखाना रोड भागातील केबीएन हॉटेल जवळ उभे होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या पाच जणांनी त्यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद सुरू केला. शाब्दिक चकमकीनंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. यावेळी आसीम कुरेशी, शेख अलताफ, शेख शाहरुख, शेख वसीम व अन्य एकाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या मारहाणीमध्ये रेहान कुरेशी हे प्रतिकार करू शकले नाही. ते एकटे असल्याचा गैरफायदा घेत त्यांना खंजर व चाकूने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने उत्तरासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी अर्शद कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पाचही आरोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.