Worm infestation on tur
वसमत, पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढल्यामुळे तुर पिकाचे उत्पन्न बऱ्यापैकी होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. परंतु तुरीवर अळीने आक्रमण केल्यामुळे तूर पिक हातचे जाईल की काय या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
यावर्षी अति पावसामुळे सोयाबीनची पार वाट लागली. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना किमान तुरीच्या पिकावर भिस्त होती. परंतु तुरीवर देखील अळ्यांनी हल्ला केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा निसर्ग कोपला पण मायबाप सरकारडूनही तुटपुंजी मदत मिळाल्याने शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे.
खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले. मात्र तुरीची पीक बऱ्यापैकी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सध्या तूर फुलोऱ्यावर तर काही शेतात तुरीला हलक्या प्रमाणात शेंगा धरल्याचेही दिसून येत आहे. परंतु पंधरा दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने परिणामी तुर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. तुरीवर अळीचा प्रादुर्भाव कायम राहील असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे मोठे नुकसान होणार आहे.
सध्या तुरीला बाजारात बऱ्यापैकी भाव आहेत. तुरीच्या पिकावर शेतकरी अनेकदा अवलंबून असतो. तुरीचे पीक कमी खर्चाचे आणि भरपूर उत्पन्नाचे असल्यामुळे शेतकरी या पिकाला प्रामुख्याने पसंती देतात.
परंतु तूर अगदी फुल बहार आणि शेंगा धारणेवर आहे. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव होतो. अळीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुरीवर कीटक नाशकाची फवारणी सुरू केली असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.