हिंगोली

Hingoli News : रामलीला मैदानावर ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच: पोलीस अधीक्षक

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवासाठी रामलिला मैदानावर तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. गर्दीचा गैरफायदा घेत छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पाच पोलिस पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे. (Hingoli News)

ऐतिहासिक दसरा महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. शहरात येणाऱ्यां अवजड वाहनांना 25 ऑक्टोबरपर्यंत मनाई करण्यात आली असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात होणारी वाहनांची गर्दी रोखणे शक्य होणार आहे. याशिवाय वाहतूक शाखेला सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रामलिला मैदानावर आयोजित कृषी व औद्योगिक प्रदर्शनामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. (Hingoli News)

या शिवाय प्रदर्शनामध्ये तसेच संपूर्ण मैदानावर तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या फुटेजची दररोज तपासणी करण्यासाठी सायबर सेलचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. त्यामुळे दररोज संशयितांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. दरम्यान, प्रदर्शनामध्ये महिला, तरुणींची गर्दी असणार आहे. त्यामुळे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पाच ठिकाणी साध्या वेशातील चिडीमार पथके नियुक्त करण्यात आले आहे. या पथकामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या शिवाय वाढीव पोलिस बंदोबस्त देखील असणार असून राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. अनुचित प्रकार करणे, छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या शिवाय बॉम्ब शोध व नाशक पथक देखील मैदानावर कार्यरत राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

या शिवाय जिल्हाभरात नवरात्र महोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. या शिवाय संवेदनशील ठिकाणी छायाचित्रीकरण देखील केले जाणार असल्याचे सांगितले.
दसरा महोत्सवाच्या काळात कोम्बींग ऑपरेशनसाठी स्वतंत्र पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई या पथकामार्फत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT