Hingoli News : अहवालानंतरही ग्राम महसूल अधिकाऱ्याला 'क्लिन चीट'! file photo
हिंगोली

Hingoli News : अहवालानंतरही ग्राम महसूल अधिकाऱ्याला 'क्लिन चीट'!

अनुदानातील गैरप्रकार प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Village revenue officer gets 'clean chit' despite the report

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूरसह इतर गावांमधून खरडणीच्या अनुदानातील गैरप्रकार ग्राम महसूल अधिकाऱ्याला महसूल प्रशासनाने सपशेल क्लिनचीट दिली असल्याचे प्रकरणात स्पष्ट होत आहे. तहसील प्रशासनाच्या अहवालात कर्तव्यात कसूर केल्याचे नमुद असतांनाही कारवाई का होत नाही याचे गौडबंगाल कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली जात आहे.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर यासह इतर गावांमधून खरडणीच्या अनुदान वाटपात गैरप्रकार झाला आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावे जमीन असतांनाही त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले तर ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध नाही त्यांच्या नावे अनुदान मिळाले आहे. भूमीहिन लाभार्थ्यांना मिळालेले अनुदान परिसरात चर्चेचा विषय बनले होते. या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने चौकशी केली.

या चौकशीमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या सहाय्यक कृषी अधिकारी व ग्राम महसुल अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्या असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यानुसार तहसील प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या अहवालात सहाय्यक कृषी अधिकारी एस. एम. संगमवार व ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम यांनी शासकिय कामात कसूर केल्याचे स्पष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य वाटते असे नमुद केले आहे.

मात्र या प्रकरणात महसूल प्रशासनाने केवळ सहाय्यक कृषी अधिकारी संगमवार यांच्यावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर ग्राम महसूल अधिकारी कदम यांच्यावर कुठल्याही प्रकाराची करवाई न करता त्यांना क्लिनचीट दिली असल्याचा आरोप होत आहे. एकाच प्रकरणात दोन कर्मचारी दोषी असतांना एकावरच गुन्हा का दाखल झाला दुसऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई का झाली नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. महसूल प्रशासनाकडूनच ग्राम महसुल अधिकाऱ्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

दोषी ग्राम महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकरी ज्ञानेश्वर जाधव, चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेतली. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे गावकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT