वसमत तालुक्यात अफूच्या शेतीवर छापा pudhari photo
हिंगोली

Illegal opium farming : वसमत तालुक्यात अफूच्या शेतीवर छापा

1 क्विंटल 77 किलो झाडे जप्त; गुन्हे शाखेची सिरळी शिवारात मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वसमत : तालुक्यातील सिरळी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतात धाड टाकून 3 लाख 54 हजार रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. लसणाच्या पिकात लपवून लावलेली ही 1 क्विंटल 77 किलो वजनाची झाडे पाहून पोलीसही अवाक झाले. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, मंगळवारी पहाटे कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आणि त्यांच्या पथकाने रात्री 11 वाजेच्या सुमारास नलगे याच्या शेतात प्रवेश केला. तिथे चार गुंठे जागेत लसणाच्या पिकांच्या आड अफूची झाडे लावली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून ताब्यात घेतली. त्यांचे वजन केले असता ते 1 क्विंटल 77 किलो भरले. या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत 3 लाख 54 हजार रुपये इतकी आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी प्रताप नलगे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे, उपनिरीक्षक कारामुंगे आणि पथकाने यशस्वी केली. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

लसणाच्या पिकात अफूचा बनाव

जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. सिरळी शिवारातील प्रताप नलगे याच्या शेतात लसणाच्या पिकात अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी रात्री आठ वाजेपासून परिसरात शोधमोहीम सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT