वसमत : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गॅस ग्राहकांची KYC करणे बंधनकारक आहे. मात्र वसमत शहरातील साई सेवा इंडियन गॅस एजन्सीमध्ये KYC च्या नावाखाली ग्राहकांकडून 200 रुपये शुल्क वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील असंख्य ग्राहकांकडून गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. KYC ही पूर्णपणे मोफत सेवा असताना देखील एजन्सी चालकांकडून पैसे मागितले जात आहेत.
ग्राहक त्रस्त
एजन्सीमध्ये गेलेल्या ग्राहकांना "KYC केल्याशिवाय गॅस मिळणार नाही" असे सांगून 200 रुपयांची मागणी केली जात आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांची मोठी लूट होत आहे. अनेक ग्राहकांनी नाईलाजाने पैसे दिल्याचे सांगितले.
नियम काय सांगतो?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या नियमानुसार KYC साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार कार्ड, बँक पासबुक आणि फोटो एवढेच दस्तऐवज यासाठी आवश्यक आहेत. तरीही वसमत येथील एजन्सीमध्ये खुलेआम पैसे घेतले जात आहेत.
कारवाईची मागणी
या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित एजन्सीवर तात्काळ कारवाई करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत इंडियन ऑइल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी देखील ग्राहकांनी दर्शवली आहे.