Vasmat Parbhani highway accident
वसमत: वसमत - परभणी महामार्गावर ऑटो पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.१०) रात्री दहा च्या सुमारास घडली. गंभीर जखमी महिलेला तत्काळ नांदेड येथे हलविण्यात आले. तर इतर दोघींवर वसमत येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री सातच्या सुमारास ऑटो प्रवासांना घेऊन वसमत येथून आरळच्या दिशेने निघाला होता. ऑटो बळेगाव ते तेलगाव पाटी च्या दरम्यान गूळ कारखान्याजवळ आली असता अचानक पलटी झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवासी मारुती पांडुरंग राखोडे (रा. आरळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर माधवी देविदास महाजन (वय 36), प्रिया भिमराव पाटील (वय 13) व चंद्रकला देविदास महाजन (वय ५०) गंभीर जखमी झाले.
यावेळी जवळच असलेल्या आरळी येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून तसेच हट्टा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. ठाणेदार संग्राम जाधव, पोलीस जमादार कासले, प्रीतम चव्हाण व दोन होमगार्ड तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी असलेल्या चंद्रकला महाजन यांना रुग्णवाहिकेतून नांदेड येथे हलविण्यात आले. तर माधवी महाजन व प्रिया पाटील यांना वसमत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेश मारुती राखुंडे व जखमी दोन महिला व एक मुलगी आरळ येथील रहिवासी आहेत. पुढील तपास ठाणेदार संग्राम जाधव करीत आहेत.