वसमत आगाराच्या ताफ्यात धावत असलेल्या जुन्या, जीर्ण आणि भंगार बसगाड्यांमुळे प्रवाशांना अक्षरशः हाल सोसावे लागत आहेत. तिकीट दरात वाढ होऊनही सुविधांच्या नावाखाली प्रवाशांना गळणाऱ्या छताखाली, तुटलेल्या खिडक्यांमधून आणि फाटलेल्या कुशन असलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. अनेक गाड्या वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
प्रवाशांना मिळणाऱ्या या असुविधांबद्दल वसमत आगार प्रशासन समाधानकारक भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे, ज्यामुळे नागरिक आणि प्रवासी संघटनांचा संताप वाढला आहे. या गंभीर समस्येकडे राज्य परिवहन विभाग आणि आगार प्रमुखांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
वसमत आगारातून छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, लातूर, कल्याण अशा लांब पल्ल्याच्या जवळपास २० महत्त्वाच्या फेऱ्या होतात. मात्र, बहुतांश गाड्या जुन्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
अनेक बसमध्ये गुटखा खाऊन थुंकलेले आणि व्यवस्थित सफाई न केलेले डबे प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. पावसाळ्यात बसमध्ये गळती होते आणि प्रवाशांचे कपडे भिजतात, तर तुटलेल्या खिडक्यांमुळे थंडी-वाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने धक्कादायक माहिती दिली आहे. दुसऱ्या आगारातून डागडुजी आणि कलर करून आलेल्या काही जुन्या गाड्या चालवताना त्या एका बाजूला हेलकावे मारतात. अशा गाड्या प्रवाशांच्या आणि चालकांच्या जीवासाठी धोकादायक असूनही, नाईलाजाने त्या रस्त्यावर चालवाव्या लागत आहेत.
वसमत आगाराला गेल्या काही महिन्यांत फक्त १० नवीन बस मिळाल्या आहेत (चार-पाच महिन्यांपूर्वी 5 आणि तीन दिवसांपूर्वी यामुळे काही मार्गांचा भार हलका झाला असला, तरी लांब पल्ल्याच्या सर्व महत्त्वाच्या गाड्या जुन्याच धावत आहेत.
परभणी डिव्हिजनमधील इतर आगारांच्या तुलनेत वसमतला नवीन गाड्यांचा पुरवठा खूप कमी झाला आहे. हिंगोलीला 19 , कळमनुरीला 11, पाथरी, गंगाखेड, जिंतूर या आगारांना वसमतपेक्षा जास्त नवीन बसगाड्या मिळाल्या आहेत.
यामुळे प्रवासी संघटनांनी थेट प्रश्न केला आहे की, वसमत आगार प्रमुखांनी वेळोवेळी ठोस पाठपुरावा केला नाही का? वारंवार बंद पडणाऱ्या आणि अन्य आगारातून केवळ कलर करून आलेल्या जुन्या गाड्या वसमतला का पाठवल्या जात आहेत?
प्रवाशांना केवळ बसमध्येच नव्हे, तर बसस्थानकातही असुविधांचा सामना करावा लागत आहे:
दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असताना, वसमत बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांना विकत घेऊन पाणी प्यावे लागत आहे.
प्रवाशांसाठी गाडीच्या वेळापत्रकाची चौकशी करण्यासाठी दिलेला फोन क्रमांक गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. कंट्रोल रूममधील उंदरांनी वायर कातरल्यामुळे ही समस्या उद्भवल्याची माहिती मिळत आहे.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमध्ये बस अडकून प्रवाशांना त्रास झाला असताना, अनेक आगारप्रमुखांनी कर्तव्याचे भान विसरून मुख्यालयी राहणे टाळले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाई होणाऱ्या ३४ आगारप्रमुखांमध्ये वसमत आगाराचाही समावेश असल्याचे कळत आहे, ज्यामुळे आगार प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनाचा ठपका बसला आहे.
प्रवाशांना योग्य दर्जेदार बस आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ही राज्य परिवहन विभागाची जबाबदारी आहे, पण वसमत आगारात या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत आहे.