

Information about government schemes will be available through QR code.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी आता हिंगोली जिल्हयातील शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारून सुरू करण्यात आलेल्या हिंगोली कलेक्टर या चॅनलचे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
राज्यात शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांची गावपातळीवर तातडीने माहिती मिळत नसल्याने पात्र व्यक्तींना त्याचा लाभ मिळत नाही. या शिवाय योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रस्तावांसोबत लागणारी कागदपत्रे याची माहिती घेण्यासाठी लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.
या शिवाय इतर उपक्रमांबाबत जनजागृती होत नसल्यामुळे गावपातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितांना अडचणी निर्माण होतात. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील ११ लाख नागरीकांच्या सोईसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून हिंगोली कलेक्टर हे चॅनल सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नागरीकांना यावर कनेक्ट होता येणार आहे.
या चॅनलच्या माध्यमातून शासकीय योजना, शासन निर्णय, जिल्हयात राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्राची माहिती जलद गतीने नागरीकांना मिळणार आहे. या चॅनलमुळे जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती मिळणार असल्याने पात्र नागरीकांना योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.
त्यातून जिल्हयातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. या शिवाय जिल्हा प्रशासनाच्या सुचनाही जलदगतीने नागरीकांपर्यंत पोहोचणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीची माहिती नागरीकांना मिळणार असून त्याचा नागरीकांना मोठा फायदा होणार आहे.