Vasmat power cut pudhari photo
हिंगोली

Vasmat power cut : दुष्काळात तेरावा महिना!; सहा तास लोडशेडिंग

पाऊस गायब, वीज गायब, शेतकऱ्यांना कोण देणार आधार

पुढारी वृत्तसेवा

वसमत : तालुक्यात एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर असताना, दुसरीकडे महावितरणकडून इमर्जन्सीच्या नावाखाली ग्रामीण फिडरवर दररोज रात्री तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या वीज कपातीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

तालुक्यात यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर पिके संकटात सापडली आहेत. अनेक शेतकरी विहिरी, बोअरवेल व विद्युत पंपांच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा गंभीर परिस्थितीत महावितरणकडून दिवसातून सहा-सहा तास वीज बंद ठेवली जात असल्याने पिकांना पाणी देणे अशक्य बनले आहे.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले असून अनेक ठिकाणी पिके वाळू लागली आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांनाच संकटात ढकलले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महावितरणच्या संकेतस्थळावर कृषी ग्राहकांना नियोजित वीजपुरवठा व लोड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. कृषी फिडरवरील वीजपुरवठा नियमित ठेवण्याचे धोरण असतानाही प्रत्यक्षात ग्रामीण भागात दीर्घकाळ वीज खंडित होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. तालुक्यातील शेतकरी संघटना आणि नागरिकांनी तातडीने लोडशेडिंग बंद करून अखंडित वीजपुरवठा द्यावा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

  • आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही वीज कपात म्हणजे "दुष्काळात तेरावा महिना" ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरीक व ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT