Shiv Sena UBT pudhari photo
हिंगोली

Hingoli News : हिंगोलीत उद्धव सेनेला संघटन बांधणीचा विसर !

शिवसैनिकाचे संपर्कप्रमुखाला खडेबोल, पक्षफुटीची भीती

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : गजानन लोंढे

मागील दोन वर्षापासून उद्धव सेनेला गळती लागली असून लागलेली गळती रोखण्यासाठी अद्यापही पक्षाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नुकत्याच पार पडलेल्या उद्धव सेनेच्या बैठकीत एका शिवसैनिकाने थेट संपर्कप्रमुख बबन थोरात यांना खडेबोल सुनावत पक्ष संघटन बांधणीकडे कधी लक्ष देणार असा सवाल केल्याने उद्धव सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. येत्या काही महिन्यात उद्धव सेनेला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात असल्याने उद्धव सेनेतील पदाधिकाऱ्यांची चलबिचल वाढली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सावरलेल्या उद्धव सेनेला जिल्ह्यात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडाने मोठा हादरा बसला. आष्टीकर यांच्या बंडानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथे शिवसैनिकांचा मेळावा घेऊन शिवसैनिकांना धिर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्धव सेनेचा एकही बडा नेता हिंगोलीकडे फिरकला नाही.

चार दिवसांपुर्वी संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षसंघटन वाढीचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान एका शिवसैनिकाने संपर्कप्रमुख थोरात यांना हिंगोलीतील पक्षवाढीबाबत प्रयत्न केले जात नसल्याची नाराजी व्यक्त करीत थोरातांना आरसा दाखविला.

संबंधित शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांची आठवण करून देत जोपर्यंत अठरापगड समाजाला सोबत घेऊन गाव तेथे शाखा स्थापन केली जाणार नाही तोपर्यंत पक्षसंघटन वाढणार नाही. माणसे का जात आहेत याचा विचार देखील पक्षाने करावा, अशा शब्दात सुनावल्याने बैठकीस उपस्थित सर्वच पदाधिकारी अव्वाक झाले.

पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने इतर पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु उद्धव सेना मात्र पक्षांतराच्या धक्क्यातून अद्यापही सावरली नसल्याचे चित्र आहे.

पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव सेनेला जोरदार धक्का देण्याची तयारी चालविली असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कळमनुरीतील एक माजी आमदार आपल्या कार्यकर्त्यासह शिंदे सेनेत दाखल होणार आहेत त्यामुळे काही महिन्यात उद्धव सेनेत मोठी फुट पडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

  • अलिकडेच उबाठाचे खासदार फुटले, त्‍याचे नेतेपद एक प्रकारे खा. नागेश पाटील यांच्याकडेच होते. या फुटीनंतर नांदेड व अन्‍य एक दोन ठिकाणी किरकोळ निदर्शने झाली. बाकी त्‍याचे फारसे पडसाद उमटले नाहीत. त्‍यामुळे या फुटीवर मूळ उद्धव सेनेतील शिवसैनिकांचाही रोष जाणवला नाही. परिणामी सामान्‍य कार्यकर्त्यानी शिंदे सेनेला पसंती दिली आहे. त्‍यातच हे सर्व खासदार पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले असून, विकासाची कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्‍यांना देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT