हिंगोली ः प्रकल्पाबाबत चौधरी यांना माहिती देताना आ. हेमंत पाटील.  pudhari photo
हिंगोली

Turmeric Research Center project : हळद संशोधन केंद्र हा राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प

केंद्रीय प्रभारी अधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केले मत

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हळदीच्या विविध उत्पादनाची निर्यात वाढावी यासाठी शेतकरी मेळावे व जागतिक परिषद आयोजित करावी. शक्य आहे तेथे नैसर्गिक शेतीत हळद लागवड संकल्पनेतून दुर्लक्षित झालेल्या हळदीला प्राधान्याने पुढे आणण्यासाठी हा संशोधन प्रकल्प निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. आगामी काही दिवसांतच हा प्रकल्प जागतिक स्तरावरही नावलौकिकास येणार असल्याचे केंद्रीय प्रभारी अधिकारी निधी चौधरी यांनी प्रकल्प भेटीदरम्यान सांगितले. या प्रसंगी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत येथे केंद्रीय प्रभारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, योगेशकुमार मीना, संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्षेत्र भेट दिली. या प्रक्षेत्र भेटी दरम्यान संशोधन केंद्रावर लागवड केलेल्या विविध हळद वाणांची पाहणी, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारणीतील सर्व प्रकल्प घटकांची माहिती घेतली.

केंद्रावर प्रगतीपथाने सुरू असलेल्या हळद प्रकिया केंद्र, वि- किरण युनिट, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, उती संवर्धन प्रयोगशाळा, मुख्य प्रशासकीय इमारत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम यांनी पीपीटीच्या मदतीने प्रकल्प उभारणीमध्ये प्राप्त निधी, लागणारा निधी, यासह हळदीचे विविध वाण, रोपे, हळद प्रमाणिकरण, हळद पिकात कृत्रिम तंत्रज्ञान वापर, शेतकरी प्रशिक्षण, जागतिक हळद परिषद, भौगोलिक मानांकन, हळद निर्यातीला चालना, विषमुक्त हळद उत्पादन, तसेच केंद्राच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

निधी चौधरी यांनी जिल्ह्यात हळद लागवड क्षेत्र वाढविणे, त्याची जास्तीत जास्त निर्यात कशी होईल यासाठी हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून केंद्रशासन राष्ट्रीय, जागतिक स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीची मागणी वाढविण्यासाठी विविध उपक्रम, मेळावे, परिषदा या माध्यमातून हळद उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर चालना देत, दुर्लक्षित हळद पिकाला प्राधान्याने पुढे आणावे.

विशेषतः सद्यस्थितीला आकार घेत असलेले हळद संशोधन केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण व सुसज्ज केंद्र निर्मितीतून, शेतकऱ्याची सुवर्णक्रांतीकडे वाटचाल व्हावी, यासाठी हा दिशादर्शक प्रकल्प लवकरात लवकर उभारणीची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संशोधन केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख, कृषी अधिकारी शिवाजी राचेवाड, तंत्र सहायक पंकज कदम, दीपाली गायकवाड, विठ्ठल कावरखे, सीताराम मुधळ, मारोती देमगुंडे, अभियंता भूषण सरोदे, रवी चीनके यांची उपस्थिती होती.

  • शेतकऱ्यांचे हित असलेल्या प्रकल्पाचे काम अनेक अडथळ्यातून यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात या दिशादर्शक प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, हळद प्रक्रियादार, खरेदीदार, निर्यातदार या सर्वांना हा लाभदायी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT