

नांदेड ः नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची बिनविरोध निवड होणार असल्याने प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया टळणार आहे. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल होईल,असे सांगण्यात येते .
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यक्रम निश्चित केल्यानंतर या पदांच्या निवडीसाठी भारतीय जनता पक्षाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. 10 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौर पदाची निवड जाहीर होणार आहे. या दोन्ही पदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी व त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल.
मनपात भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोन्ही पदासाठी एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल होणार नाहीत, यासाठी स्थानिक भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेपूर्वीच महापौर पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, संजय कोडगे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविकांची मते जाणून घेतली.
10 फेब्रुवारीपूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली जाणार असून या बैठकीत महापौर व उपमहापौर पदाच्या नावांवर सार्वमत घेतले जाईल. त्यानंतर नाम निर्देशन पत्र दाखल करण्याच्या सूचना संभाव्य उमेदवारांना दिल्या जातील अशीही माहिती आहे.