Kalamnuri Dati bridge truck fire
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील दाती ब्रिजवर दिल्लीहून चेन्नईकडे जात असलेल्या ट्रक (RJ14GN3037) च्या इंजिनला अचानक आग लागली. ही घटना आज (दि. ८) सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.
चालक हेमंत कुमार राजेंरा, रा. जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश यांनी सांगितले की ट्रकमध्ये 100 फ्रिज चेन्नईकडे नेण्यासाठी भरलेले होते. घटना कळताच, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गोणारकर, जमादार शिवाजी पवार आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावर वाहतूक सुरळीत केली आणि नांदेडकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गावर वळवली.
महामार्ग प्राधिकरणाला घटना कळवली असता, जरोडा पथकर नाक्यावर अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे कळमनुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आग नियंत्रणात येत नसल्याने अर्धापूर येथील अग्निशमन दलाची मदत घेऊन ट्रकवरील आग पूर्णपणे आटोक्यात आणली गेली. पोलिसांनी म्हटले की, जर पथकर नाक्यावर अग्निशमन वाहन उपलब्ध असते, तर नुकसान अधिक कमी केले जाऊ शकले असते.