बफेच्या जमान्यातही गावरान पंगतीची गोडी कायम! pudhari photo
हिंगोली

Traditional Indian Wedding Feast : बफेच्या जमान्यातही गावरान पंगतीची गोडी कायम!

वेळेअभावी केटरिंगचा ट्रेंड वाढला, तरीही ग्रामीण भागात आग्रहाच्या जेवणाची परंपरा अबाधित

पुढारी वृत्तसेवा

अनिल पोरवाल

जवळाबाजार : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळ, पैसा आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे लग्नसमारंभात बफे पद्धत रूढ झाली आहे. उभे राहून जेवण्याची ही पद्धत आता खेड्यापाड्यातही पोहोचली असली, तरी ग्रामीण भागात आजही भारतीय बैठक व्यवस्थेतील पंगतीची प्रथा आणि तिची गोडी कायम आहे. पत्रावळीवर वाढलेल्या आणि आग्रहाने खाऊ घालणाऱ्या त्या जेवणाची सर बफेला येत नसल्याची भावना खवय्ये व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागात विवाह सोहळा असो वा धार्मिक कार्यक्रम, जेवणाच्या पंगतीला एक वेगळेच महत्त्व असते. जमिनीवर बसून रांगा, समोर केळीचे पान किंवा पत्रावळी, द्रोण, पाण्याचे ग्लास आणि माठातले थंडगार पाणी... हे दृश्य आजही मनाला सुखावते. त्यातच मेनूमध्ये पोळी, वांग्याची रस्सा भाजी, गरमागरम भजी, मसालेभात, बुंदी आणि जोडीला मठ्ठा या पदार्थांची रेलचेल असते. वाढपी मंडळी “अजून थोडे घ्या” म्हणत जो आग्रह करतात, त्या प्रेमामुळे अन्नाची चव अधिकच वाढते. एकाच वेळी हजारो लोकांची पंगत उठतानाचे नियोजन आजही ग्रामीण भागात वाखाणण्याजोगे असते.

बफेकडे का वाढला कल?

पूर्वी लग्नसमारंभात मित्रमंडळी आणि नातेवाईक चार-पाच दिवस आधीच मदतीला येत असत. त्यामुळे आचारी लावून जेवण बनवणे आणि वाढणे शक्य व्हायचे. मात्र, आता पाहुणे मंडळी केवळ दोन-तासांसाठी कार्यक्रमाला येतात. मनुष्यबळाची कमतरता आणि वेळेची बचत करण्यासाठी आता सर्रास कॅटरिंग आणि ‌‘बफे‌’ पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ताटांच्या संख्येवर पैसे ठरत असल्याने अन्नाची नासाडी टाळणे आणि कमी वेळेत नियोजन करणे सोपे झाले आहे.

चवीत आणि भावनेमध्ये फरक

बफेमध्ये प्लास्टिकची ताटे, मिनरल वॉटर आणि शॉर्टकट मेनू असतो. तिथे वाढपी नसतात, त्यामुळे ‌‘आग्रहाने वाढणे‌’ हा प्रकारच हद्दपार झाला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात आजही लाकडाच्या भट्टीवर मोठ्या पातेल्यांत जेवण शिजवले जाते. गॅसवरील जेवणापेक्षा भट्टीवर शिजलेल्या जेवणाची चव नैसर्गिक आणि खमंग असते. आज शहरांतून बफेचे लोण खेड्यांत आले असले तरी, हरिनाम सप्ताह, भंडारे आणि मोठ्या सोहळ्यांत अजूनही मांडी घालून पंगतीत जेवण्याची परंपरा टिकून आहे. बफेच्या सोयीस्कर जगातही पंगतीची आठवण आणि तिची गोडी आजही टिकून आहे.

भट्टीवरच्या जेवणाची चवच भारी!

शहरी भागात आणि केटरिंगमध्ये वेळेच्या बचतीसाठी गॅसचा वापर करून झटपट पदार्थ बनवले जातात. मात्र, ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक होतो. मंद आचेवर शिजलेल्या या अन्नाची चव आणि त्यातील ‌‘स्मोकी फ्लेवर‌’ बफेमधील जेवणात मिळत नाही, हे मात्र नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT