वर्षभरापासून तीन शववाहिका धूळखात pudhari photo
हिंगोली

Mortuary Van Hingoli : वर्षभरापासून तीन शववाहिका धूळखात

सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी दिलेल्या तीन शववाहिका मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणासन्न अवस्थेत आहेत. या वाहनांसाठी ना इंधन उपलब्ध आहे ना चालक त्यामुळे या शववाहिका धूळखात पडल्या आहेत. या शववाहिकांचा उपयोगच केला जात नसल्याचे चित्र आहे.

आरोग्य विभागाने राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांकडे शववाहिका दिल्या आहेत. शहरी भागात उपचार घेत असतांना रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्यासाठी या शववाहिका देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी तीन शववाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत.

या शववाहिका नेण्यासाठी तातडीने चालक पाठविण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या (परिवहन सेवा) पुणे येथील उपसंचालक कार्यलयाने दिल्या होत्या. त्यानुसार हिंगोलीच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने 14 जून 2025 रोजी तीन चालकांची नियुक्ती करून त्यांना सदर शववाहिका पुणे येथून आणण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार इंधन खर्च व चालकांच्या खर्चासाठी अग्रीम रक्कमही देण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाच्या तीन चालकांनी पुणे येथे जाऊन शववाहिका हिंगोलीत आणल्या. मात्र त्यानंतर शववाहिका चालविण्यासाठी इंधनचा खर्च कसा करायचा तसेच चालकाचे मानधन कसे द्यायचे, या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने तीनही शववाहिका तीन प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवून दिल्या. मागील एक वर्षापासून या शववाहिका एकाच ठिकाणी उभ्या असून त्याचा वापरच होत नसल्याने शववाहिका जागेवरच खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

  • सदर शववाहिका कोणत्या योजनेतून खरेदी करून पाठविण्यात आल्या याची माहिती नाही. मात्र शववाहिका घेऊन जाण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने त्या आणण्यात आल्या आहेत. आता त्यांचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील तीन नगर पालिकांना दिल्या जाणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT