Hingoli News : रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा File Photo
हिंगोली

Hingoli News : रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

रस्ता झाला खड्डेमय, वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

पुढारी वृत्तसेवा

The railway flyover road is in a bad condition due to potholes

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील खटकाळी भागात सुमारे १०० कोटी पेक्षा अधिक रक्कम खर्च करून उभारण्यात आलेला भारतरत्न नानाजी देशमुख रेल्वे उड्डाण पुलाचा रस्ता अवघ्या दोन वर्षातच खड्डेमय झाला आहे. या उड्डाणपुलावरून जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

शहरातील रेल्वे विभागाच्या १४४ बी या विशेष रेल्वे गेटवर वाहतूक वारंवार ठप्प होत होती. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारणी करून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात होती. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वे खात्याच्या वतीने कामकाज करण्यात आले. दोन वर्षापूर्वी या उड्डाणपुलाच्या बांधकामाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. मात्र उद्घाटन होऊन दोन वर्षातच उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला आहे. एका ठिकाणी जॉईंटवर हा रस्ता खचला आहे.

तर रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर वाहने खड्ड्यात गेल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चार चाकी व दुचाकी वाहनचालकांच्या पुलावरून प्रवास करताना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच कहर म्हणजे या उड्डाणपुलावर बसविण्यात आलेले पथदिवे बंद असल्यामुळे पुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे.

या संदर्भात रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने वाहन चालकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूने नव्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र हा रस्ता पूर्ण होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही रस्ता सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होऊ लागली असून दुचाकी वाहन चालकांनीही रेल्वे उड्डाणपुलावरूनच जावे लागत आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या बांधकाम विभागाने या उड्डाणपुलावरील रस्ता दुरुस्त करावा तसेच नव्याने बांधकाम केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT