हिंगोली ः स्वच्छ भारत मिशन व आणि जल जीवन मिशनअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 1200 पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी थकीत मानधन व विविध मागण्यांसाठी बुधवारपासून कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे राज्यभरात स्वच्छभारत मिशन व जल जीवन मिशनची कामे ठप्प होणार असल्याचे चित्र आहे. त्यानंतर साखळी उपोषण सुरु केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1200 पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. स्वच्छ भारतमिशन मध्ये मागील 10 ते 15 वर्षापासून हे कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र तुटपुंजा मानधनावर देखील हे कर्मचारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह इतर कामांचा समावेश आहे.
दरम्यान, या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार ते पाच महिन्यापासून मानधन थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने अदा करावे या मागणीसाठी कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची शासनपातळीवर दखल घेण्यात आली नाही. याप्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधून असंतोष निर्माण झाला आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 9 फेब्रुवारी पासून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे निवासस्थान, स्वच्छता मिशन कार्यालय परिसरात आणि मुंबईतील आझाद मैदान उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे स्वच्छ भारत मिशनचा आगामी वर्षाचा कृती आराखडा, योजनांची क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण, ऑनलाईन नोंदी आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज ठप्प होणार आहे.