सेनगाव : धनगरवाडी येथे विहिरीत उतरून आंदोलन करताना शेतकरी. pudhari photo
हिंगोली

Farmers protest in well Hingoli : धनगरवाडी येथे शेतकऱ्यांचे विहीर आत्मक्लेश आंदोलन

विहीर अनुदान अपहार प्रकरण, तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सेनगाव : तालुक्यातील धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या अनुदानात गंभीर अपहार झाला असून या प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी विहिरीत उतरून विहीर आत्मक्लेश आंदोलन केले.

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडीमध्ये रामचंद्र खडसे यांच्या शेतात हमी योजने अंतर्गत विहीरीचे काम न करताच १.७५ लाख रुपयांचे अकुशल देयक काढण्यात आले. विशेष म्हणजे खडसे यांच्या परस्-परच विहीरीचे काम झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र शेतात विहीर नसतांनाही काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आल्याने खडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन विहीर चोरीला गेल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्या पथकाने चौकशी केली. यामध्ये शेतात विहीरच नसल्याचे दिसून आले. या शिवाय इतर शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सात ठिकाणी पाहणी केली असता चार ठिकाणी विहिरीचे कामच झाले नसल्याचे दिसून आले तर एका ठिकाणी विहीरीची मंजूरी एका गटात तर खोदकाम दुसऱ्या गटात झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल देखील नायब तहसीलदार वाघुंडे यांनी सादर केला आहे.

या प्रकरणात गोरेगाव पोलिस ठाण्यात पालक तांत्रिक अधिकारी के. बी. देशपांडे, ग्रामरोजगार सेवक मनोज खडसे यांच्या विरुध्द ६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणातील अन्य दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकाराची कारवाई झाली नाही. या प्रकारामुळे शेतकरी श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, विनोद खडसे, रुस्तुमा होळपादे, बळीराम रवणे, प्रल्हाद गबारे, माधव खडसे, गौरव पाळते यांनी विठ्ठल तिडके यांच्या शेतातील विहीरीमध्ये आत्मक्लेश आंदोलन केले.

  • ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनीही आंदोलनकर्त्याची भेट घेऊन विहिरीत उतरून आंदोलनात सहभाग घेतला आहे. पंचायत समिती व इतर विभागाचा एकही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT