सेनगाव : सेनगाव नगरपंचायतीच्या ठरावानुसार पात्र ठरलेल्या आशा सेविका पदाच्या नियुक्त्या जाणीवपूर्वक थांबविल्या गेल्याचा आरोप करत, पाच पात्र महिलांनी गुरुवार (दि. 11 डिसेंबर) पासून सेनगाव तालुका आरोग्य कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि. 12 डिसेंबर) रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
या अनुषंगाने, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे 10 डिसेंबरपर्यंत नियुक्ती आदेश न झाल्यास उपोषणाचा इशारा देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सौ. रुखिया परविन सय्यद, सौ. विमल शामराव गाढवे, सौ. नंदा प्रकाश तनपुरे, सौ. सारीका शुभम तिडके आणि श्रीमती अनुसया मारुती हजारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्या महिलांनी जोपर्यंत नियुक्ती आदेश येणार नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे दुसऱ्याच दिवशी प्रशासनाची धावपळ उडाली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेतली. पंधरा दिवसांमध्ये नगरपंचायत अंतर्गत रिक्त आशा सेविकांची पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर महिलांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्युस घेऊन दोन दिवसांपासून चाललेले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी पंडित तिडके, माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक वैभव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पात्र असूनही नियुक्ती थांबवली
सेनगाव नगरपंचायतीच्या ठराव क्र. 112 अंतर्गत पाच महिलांना आशा सेविका पदासाठी पात्रता देण्यात आली होती. हिंगोलीचे पालकमंत्री ना. नरहरी झिरवाळ, राज्याच्या आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह आरोग्य संचालक व उपसंचालक यांच्या आदेशानंतरही स्थानिक पातळीवर नियुक्ती प्रक्रिया थांबवून ठेवल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला होता.