Ganja cultivation in Ranjona
हिंगोली ः वसमत तालुक्यातील रांजोना शिवारात एका शेतातील भुईमुगाच्या पिकात गांजाची झाडे आढळून आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतातून 87 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी एका शेतकर्यावर हट्टा पोलिस ठाण्यात एका शेतकर्याविरुध्द सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात 1 मे ते 30 मे या कालावधीत अंमलीपदार्थ विरोधी कारवाईची मोहिम हाती घेण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेेचे निरीक्षक विकास पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हयातील 13 पोलिस ठाण्यांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेची पथकेही कार्यरत करण्यात आली आहेत. जिल्हाभरात अंमली पदार्थांची विक्री करणार्या ठिकाणांची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, संग्राम जाधव, जमादार कृष्णा चव्हाण, नितीन गोरे, गजानन पोकळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, प्रितम चव्हाण, दिंडे, आसीफ, सुरुशे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळपासून रांजोना शिवारात तपासणी सुरु केली होती.
यावेळी रात्रीच्या सुमारास रामदास साळवे याच्या शेतातील भुईमुगाच्या पिकात गांजाची झाडे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेली झाडे उपटून जप्त केली. या गांजाच्या झाडाचे वजन साडेचार किलो असून त्याची किंमत 87 हजार रुपये आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून संबंधित शेतकर्याने गांजाचे बियाणे कोठून आणले होते, कधीपासून गांजाची लागवड करतो तसेच त्याची विक्री कुठे केली जाते याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे.