

नंदुरबार : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ लाख ३९ हजार २०० रुपयांचा अवैध विदेशी मद्याचासाठा आणि वापरातील चारचाकी वाहन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कंजरवाडा रस्त्यावरून एक व्यक्ती लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपास सुरू केला.
पोलिसांनी एमएच ४१ व्ही ०७४२ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या वाहनाचा पाठलाग करून यशवंत विद्यालय परिसरात अडवले. वाहनचालक विजयसिंग रामसिंग नाईक (५०, रा. केरवा, खांडबारा) व सोबत असलेला पंकज प्रकाश चौधरी (३४, रा. संताजी चौक, खांडबारा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. सदर दारूसाठ्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
एकूण ५ लाख ३९ हजार २०० रुपयांचा विदेशी मद्य व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, रविंद्र बागुल, स्वप्नील पाटील, भटू धनगर, सुनिल वाकडे, राहुल पांढारकर, भगवान मुंडे, हरेश कोळी, किरण मोरे, मपोकॉ. निंबाबाई वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.