HingolI Rains have stopped; sowing has slowed down
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली. परंतु, मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणी मंदावली आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढला असताना दुसरीकडे पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ ४४ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्हयात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा होता. त्यानंतर १० जूनपासून पाऊस सुरू झाला. वादळी वारे व पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा तर वसमत तालुक्यातील गिरगाव, कुरूंदा परिसरातील केळीसइ इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पंचनामे सुरू झाले आहेत.
एकीकडे वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान झाले असताना दुसरीकडे अल्पशा पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीचा जुगार खेळला. परंतु, मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. खाजगी सावकारांच्या दारात जाऊन बि, बियाण्यांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना लांबलेला पाऊस हतबल करणारा ठरतो आहे.
यंदा जिल्ह्यात जवळपास २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतशिवारात मागील तीन दिवसांपासून सोयाबीन पेरणीची लगबग सुरू होती. परंतु, पावसाने खंड दिल्याने शनिवारपासून पेरणीसाठी शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला आहे. हवामान खात्याने १८ जूनपर्यंत भाग बदलत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असला तरी अद्यापतरी पावसाने हजेरी लावलेली नाही. काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु, तो पाऊस पेरणीयोग्य होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
मागील दोन वर्षापासून हळदीला समाधानकारक दर मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. सोयाबीन व कपाशीला पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद लागवडीला पसंती दिली आहे. यंदा जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली हळदीची लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून हळद लागवड केली आहे. ती हळद आता उगवली आहे.