Rabid Fox Attack Elderly Woman Injured
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे पिसाळलेल्या कोल्हयाने केलेल्या हल्ल्यात 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि.१६) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. जखमी महिलेचे नाव पंचफुलाबाई आप्पाराव लोंढे असे आहे.
महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्या कोल्हयाने लाख गावात धुमाकूळ घातल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचफुलाबाई सायंकाळी 6 च्या सुमारास आपल्या घरात देवासमोर पूजा करीत बसल्या असताना अचानक आलेल्या कोल्ह्याने पंचफुलाबाईंवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पंचफुलाबाई यांच्या नाकासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
दरम्यान, पंचफुलाबाई यांच्यावर हल्ला केल्यानंतर कोल्ह्याने गावातील एका युवकावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांना दिल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गावात पाठविले.