Purna Sugar Factory File Photo
हिंगोली

Purna Sugar Factory: पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट २०२६ मध्ये सन्मान

महाराष्ट्र शासन आयोजित डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट २०२६ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर याचा विशेष सन्मान करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Purna Sugar Factory

वसमत : भिमराव बोखारे

महाराष्ट्र शासन आयोजित डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट २०२६ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर याचा विशेष सन्मान करण्यात आला. शुक्रवारी (दि. २७) हिंगोली येथे झालेल्या या समिटमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातील सहकारातील पहिला १० मे. टन सीबीजी प्रकल्प व ४० केएलपीडी मल्टी फीड ग्रेन बेस्ड इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीतील योगदानाबद्दल पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा हा गौरव करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात अशा प्रकारचा आधुनिक व पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

सीबीजी प्रकल्पासाठी प्रेसमड, स्पेंट वॉश व नेपियर ग्रास यांचा वापर करून गॅस निर्मिती होणार आहे. यामुळे कारखान्यातील टाकाऊ पदार्थांचा योग्य वापर होऊन पर्यावरणाचे रक्षण होणार असून शेतकऱ्यांना नेपियर ग्रास लागवडीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे. तसेच ४० केएलपीडी ग्रेन बेस इथेनॉल प्रकल्पासाठी मका, तुटलेला तांदूळ यांचा वापर करून इथेनॉल तयार केले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मका व तांदूळ पिकाला हक्काची बाजारपेठ मिळणार असून पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल निर्मिती होऊन देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाला हातभार लागणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे परिसरातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. पूर्णा सहकारी साखर कारखाना हा केवळ साखर निर्मितीपुरता मर्यादित न राहता, आता ऊर्जा, इंधन व पर्यावरण संरक्षण या क्षेत्रातही पुढाकार घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांसमोरही एक आदर्श निर्माण झाला आहे.

या सन्मानामुळे वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व संचालक मंडळामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी व जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अशाच नवनवीन प्रकल्पांची उभारणी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उद्योगपती, अधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT