Preparations for Hingoli Municipal Council elections, inspection of polling stations
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध मतदान केंद्रांना गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर, रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली शहरातील अण्णा भाऊ साठे वाचनालय, इकबाल उर्दू स्कूल पेन्शनपुरा, लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी भवन, भारती विद्यामंदीर, नगर परिषद शाळा, आजम कॉलनी येथील इकबाल इंटरनॅशनल स्कूल, माहेश्वरी भवन येथील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदान केंद्रावरील सुविधांची पाहणी केली.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रांवर वीजपुरवठा राहील याकडे लक्ष ठेवावे तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शहरात आदर्श मतदान केंद्र उभारण्याचीही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय कळमनुरी वसमत शहरातील मतदान केंद्रावर स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी करावी.
यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे, स्वच्छता निरीक्षक बाळ बांगर, पिंटू बोरसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने आता सर्व मतदान केंद्रांवर पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.