Hingoli News : हवेची झुळूक येताच रात्रभर वीजपुरवठा गुल File Photo
हिंगोली

Hingoli News : हवेची झुळूक येताच रात्रभर वीजपुरवठा गुल

वरिष्ठ अधिकारी करतात उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम

पुढारी वृत्तसेवा

Girgaon in Vasmat taluka Power outage overnight

गिरगांव, पुढारी वृत्तसेवा :

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाऱ्याची झुळूक येताच रात्र रात्र वीजपुरवठा गुल होत आहे. महावितरणच्या गलथान व मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कधी कुरुंदा तर कधी गिरगाव येथून वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मात्र लाहीलाही होताना दिसत आहे.

आजपर्यंत गिरगाव येथे महावितरण विभागाच्या या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. गावातील व शेतातील अनेक विद्युत तारा डोक्याला लागण्यासारख्या लोंबकळत आहेत. पण वारंवार सूचना देऊनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. महावितरण विभागाकडून वीज बिलाची वसुली मात्र जोरात केली जाते.

पण ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. या लोंबकळत असलेल्या तारा बदलण्यासाठी अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी यांच्या मागणी करण्यात आली. परंतु, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. वसमत तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गिरगाव तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज सर्व पक्षातील मंडळीचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक आहे पण गावाची अवस्था दयनीय झाली असून सुद्धा याकडे लक्ष देण्यास कुणी ही तयार नाही. त्याच बरोबर वरिष्ठ अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. कारण गावातील कार्यालयात उपस्थित न राहता तालुक्याच्या ठिकाणाहून कारभार चालवण्याचे काम करत असल्याचे बोलल्या जात आहे.

त्यातच कोणत्या कामाची दुरुस्ती करायची झाले तर कार्यालयात दुरुस्तीसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे साहित्य वेळेवर उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारीही अनेक वेळा ऐकावयास मिळतात. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने रात्री-बेरात्री जर साधा फ्यूज जरी गेला तर नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. तसेच शेतात वीज पुरवठा करणाऱ्या तारांना झाडाच्या फांद्या लागून फॉल्ट झाला तर तो फॉल्ट काढण्यासाठी कर्मचारी यांना दोन-दोन दिवस लागत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रात्रीच्या वेळी शेतात उजेड रहावा म्हणून वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतात सिंगल फेजची व्यवस्था केली आहे. पण ही सेवा फक्त नावालाच उरली आहे. जर कुठे फॉल्ट झाला तर चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतात मुला-बाळांना घेऊन राहणाऱ्या शेतमजुरांना अंधारात रात्र काढावी लागते. त्यातच सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे साप, विंचू, रानडुक्कर या सारखे प्राणी रात्रीला बाहेर पडतात. त्यामुळे या रात्रीच्या वेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे प्राण्यांपासून शेतमजुरांना धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT