Police surprise search operation
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरात पोलिसांच्या पथकाने रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सरप्राईज सर्च ऑपेरशन सुरु केले. यामध्ये तब्बल ५० पेक्षा अधिक ठिकाणी घर झडती सोबतच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोन ठिकाणी धारदार खंजर आढळून आले आहे.
हिंगोलीसह वसमत व कळमनुरी पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच समर्थकांकडून प्रचाराला वेग दिला जात आहे. त्यामुळे तीनही पालिकांमधून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून आचारसंहितेचे पालन व्हावे तसेच कोणत्याही दबावाशिवाय खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत आहेत. शहरात रविवारी सकाळी पाच वाजल्या पासून पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे, श्यामकुमार डोंगरे यांच्यासह २५ अधिकारी व १५० कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार व सराईत गुन्हे असलेल्या इसमांच्या घरी झाडाझडती सुरु केली.
यामध्ये अवैध शस्त्र किंवा निवडणूक संदर्भाने अवैधरीत्या जमा केलेले पैसे, निवडणुकीत वाधा आणण्यासाठी काही साहित्य ठेवले आहे का? याबाबत तपासणी करण्यात आली. तसेच संशयित इसमांच्या वाहनाची सुद्धा तपासणी करण्यात आली. यावेळी रेकॉर्डवरील ५० इसमांच्या घराची व वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये राजू कोठुळे (रा. बासंबा), महेश गीते (रा. चांदापूर) यांच्याकडून दोन शस्त्र जप्त केले.