Parbhani Hingoli MLC Election pudhari photo
हिंगोली

Parbhani Hingoli MLC Election : महायुतीत ‘ऑपरेशन नाराजी ‘ ची चर्चा !

अनेक मतदारांना हलविले, देशमुखही सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

गजानन लोंढे

हिंगोली : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. वरवर पाहता महायुती एकत्र असल्याचे चित्र असले तरी पडद्यामागे सुरू असलेल्या नाराजीच्या राजकारणामुळे महायुतीची चिंता वाढली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याने या निवडणुकीत ऐनवेळी राजकीय ट्विस्ट निर्माण होईल असा दावा राजकीय तज्ञांनी केला आहे.

या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीकडून शिंदे सेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष म्हणून सुशिल देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तीनही उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने भाव वधारेल अशी मतदारांना आशा होती. परंतु, तिन्ही उमेदवारांनी आखडता होत घेतल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे.

एका उमेदवाराकडून काही रोख रक्कम व निवडून आल्यानंतर कामे असा शब्द मतदारांना दिला जात आहे. तर दुसऱ्या उमेदवाराकडून देखील केवळ नगदी स्वरूपाचे पाकीट दिले जात असल्याची राजकीय कुजबूज सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गत निवडणुकीत पराभवाचा सामना केलेल्या एका नेत्याच्या मुलानेदेखील या निवडणुकीत उडी घेतली असून मागील निवडणुकीतील वडिलाने दिलेल्या शब्दाची उधारी फेडण्यासह या निवडणुकीसाठी एकत्रित लक्ष्मीदर्शन घडविले जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तब्बल ८ वर्षानंतर मतदारांना उधारीसह रोख रक्कम मिळत असल्याने स्पर्धेत नसलेले अपक्ष उमेदवार मागील दोन दिवसात चर्चेत आले आहेत. सुशील देशमुखांच्या सक्रियतेमुळे महायुतीचे उमेदवार सईद खान यांना देखील हात खुला सोडावा लागला आहे. परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यातील मतदारांना थेट सहलीवर नेले गेले आहे. हिंगोलीतील मतदार मात्र सहल व रिसॉर्ट पॉलिटिक्सपासून दूर असल्याचे चित्र आहे. तिन्ही उमेदवारांकडून आपापल्यापरीने ताकद लावली जात असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांना अपेक्षित असणारा भाव कुणीही देत नसल्याने मतदारांचा चांगलाच भ्रमनिरास झाल्याचे बोलले जात आहे.

  • महायुतीतील संभाव्य मतफुटीची शक्यता लक्षात घेऊन सईद खान यांनी सावध भुमिका घेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीतील मतदारांशी मतदानापुर्वी विरोधी पक्षाकडून किंवा नाराज गटाकडून संपर्क होऊ नये आणि मतदार एकसंघ रहावेत यासाठी महायुतीचे नेते सतर्क झाले आहेत. शिंदे सेना कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT