हिंगोली ः जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी मुलाखतीचे पॅनल दररोज बदलण्याचा फंडा राबविला जात आहे. तर या मुलाखत प्रक्रियेवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे पथक लक्ष ठेऊन असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील तीन उपविभागांतर्गत पाच तालुक्यांतून पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, विकास माने, समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा झाल्यानंतर सुमारे 1970 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.
12 फेबु्रवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, तीन उपविभागांतर्गच पाच तालुक्यांतील पात्र उमेदवारांना त्यांना दिलेल्या दिवशी आवश्यक कागदपत्रे घेऊन हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वसमत उपविभागातील मुलाखती 18 फेब्रुवारीपर्यंत तर कळमनुरी तालुक्यातील मुलाखती 20 फेब्रुवारी तर हिंगोली तालुक्यातील मुलाखती 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता रहावी तसेच योग्य उमेदवारांची निवड होण्यासाठी मुलाखतीसाठी दररोज अधिकाऱ्यांचे पॅनल बदलण्याचा फंडा राबविला जात आहे. यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांच्या पॅनलकडून कोणत्या तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील हे अधिकाऱ्यांना आदल्या दिवशी रात्री कळविले जात आहे.
या शिवाय भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होत असून उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडून आपले नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.