Fire Pudhari
हिंगोली

पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला आग

संकलित मूल्यमापन चाचणीचे १२ हजार पेपर जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

Panchayat Samiti's center catches fire

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला लागलेल्या आगीमध्ये संकलीत मूल्यमापन चाचणीचे तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाल्याचा प्रकार बुधवारी घडला. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी सांगितले.

राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची संकलीत मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. भाषा, गणित व इंग्रजी विषयाची हि परिक्षा असून ११, १५ व २२ एप्रिल रोजी हि परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिषदेकडून सर्व जिल्हयांना पेपरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातही पेपरचा पुरवठा झाला असून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून केंद्रस्तरावर पेपर पाठविले जात आहेत. मागील तीन दिवसांपासून हे काम सुरु आहे.

दरम्यान, औंढा नागनाथ गटसाधन केंद्रातून तालुक्यातील १३ केंद्रापैकी सात केंद्रांना पेपर वाटप झाले असून सहा केंद्रावर पेपर वाटप करण्याचे काम सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्याला दिसून आले. त्यानंतर कर्मचारी पांडूरंग सुर्यवंशी यांनी सदर प्रकार गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफीक यांना कळविला.

गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, गटशिक्षणाधिकारी तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, शेख इकबाल, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या आगीमध्ये तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तौफीक यांनी सांगितले. शार्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यादृष्टीने पोलिसांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे.

शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी या प्रकरणी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवल्याची माहिती दिली. सदर घटनेमध्ये १२ हजार पेपर जळाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवली आहे. पेपर प्राप्त झाल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेलाच परिक्षा होईल असे काळे म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT