Palkhi arrives in Marathwada amid the chants of 'Gan Gan Ganaat Bote'
सेनगाव : पुढारी वृत्तसेवा
गण गण गणात बोते च्या गजरामध्ये श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दिंडीचे मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा फाटा येथे गुरुवारी सकाळी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. दिंडीचा हिंगोली जिल्हयात तीन दिवस मुक्काम राहणार आहे.
श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांची दिंडी हिंगोली मार्गे पंढरपूरकडे जाते. विदर्भातून निघालेली दिंडी मराठवाड्यात म्हणजेच हिंगोली जिल्हयात प्रवेश करते. मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या वाढोणा येथे दिंडीचे स्वागत केले जाते.
त्यानंतर पाकनेरगाव येथे स्वागत करून दिंडी सेनगाव येथे सायंकाळी उशिरा मुक्कामी थांबली. यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळच्या सुमारास दिंडीचे वाढोणा येथे आगमन होणार असल्याने ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
शेकडो भाविक हाती फुले घेऊन दिंडीच्या स्वागतासाठी सज्ज होते. या दिंडीचे पहाटे वाढोणा फाटा येथे आगमन होताच उपस्थित भाविकांनी गण गण गणात बोते चा गजर केला. यावेळी भाविकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.